मला खो दिला पूनमने : http://www.kathapournima.blogspot.com/ मागे एकदा पूनमने असाच वाचनीय उतारा लिहीण्यासाठी खो दिला होता. वेळेअभावी त्यावेळी लिहायला जमलं नव्हतं. यावेळी चटकन लिहावं असा विचार केला नाहीतर हाही लिहायचा राहून जायचा असं नको व्हायला.
कविता हा आवडणारा विषय आणि त्यामुळे आवडणार्या कविता खरोखर खूप आहेत त्यातून दोन निवडायच्या म्हणजे फारच अवघड गोष्ट. त्यातही कुठल्या कविची लिहावी? मग विचार केला की डोळे मिटून कविता असा विचार केला की पहिली कुठली कविता येते आपल्या मनात ती लिहावी.
त्या बाबतीत मात्र बा. भ. बोरकरांची हि कविता नेहेमीच अग्रक्रमावर.. ह्या कवितेची आणि माझी ओळख मी दहावीत असताना झाली असावी. पहिल्यांदा हि कविता वाचताना काटा उभा राहिला. या कवितेचं खरं यश म्हणजे तसाच, तोच अनुभव त्यानंतर प्रत्येकवेळी हि कविता वाचताना आलाय.
देखणे ते चेहरे... कवि बा. भ. बोरकर.
देखणे ते चेहरे
जे प्रांजळाचे आरसे ।
गोरटे की सावळे
या मोल नाही फारसे ॥
तेच डोळे देखणे
जे कोंडीती सार्या नभा ।
वोळिती दुःखे जनांच्या
सांडिती नेत्रप्रभा ॥
देखणे ते ओठ की जे
ओविती मुक्ताफळॆ ।
आणि ज्यांच्या लाघवाने
सत्य होते कोवळे ॥
देखणे ते हात ज्यांना
निर्मितीचे डोहळे ।
मंगलाने गंधलेले
सुंदराचे सोहळॆ ॥
देखणी ती पाऊले
जी ध्यासपंथे चालती ।
वाळवंटातूनसुद्धा
स्वस्तिपद्मे रेखिती ॥
देखणे ते स्कंध ज्या ये
सूळ नेता स्वेच्छया ।
लाभला आदेश प्राणां
निश्चये पाळावया ॥
देखणी ती जीवने
जी तॄप्तीची तीर्थोदके ।
चांदणॆ ज्यातुन वाहे
शुभ्र पार्यासारखे ॥
देखणा देहान्त तो
जो सागरी सुर्यास्तसा ।
अग्निचा पेरुन जातो
रात्रगर्भी वारसा ॥
दुसरी कविता लिहीणार आहे ती वैभवची आहे. त्याची परवानगी न घेताच लिहितेय.
कोण कुठला मेघ... कवि वैभव जोशी
कोण कुठला मेघ वेडा,
घेऊनी डोळ्यात पाणी..
थांबतो येऊन दारी,
चर्र होते..
बोलतो काही न मीही..
बोलतो काही न तोही..
वेदना लपवित सारी,
आत येतो..
स्पष्ट कोठे घाव नाही,
सांत्वनेला वाव नाही,
मोकळे होणार केव्हा?
कोण जाणे..
काहिली देऊन झाली..
काहिली घेऊन झाली..
पाहुनी झालेत लाखो,
पावसाळे..
माझा खो आहे..
सुमेधा: http://samidhach-sakhya.blogspot.com/
लोपा: http://lopamudraa.blogspot.com/
गुंजन: http://gunjaaish.blogspot.com/ (मला माहितीये तुला इतकं मराठी लिहायला लावणं म्हणजे कठीण काम आहे पण हेही माहित आहे की तुला कवितांची आवड आहे.... म्हणून हा खो तूलापण.)
Monday 8 September 2008
Subscribe to:
Posts (Atom)