इश्क ने निकम्मा कर दिया गालिब
वरना हम भी आदमी थे काम के...
इश्क नचाये जिसको यार..
वो फिर नाचे बीच बजार..
प्रेमाच इतक्या सार्थ शब्दात वर्णन करणाऱ्या त्या कविंना सलाम!
प्रेमाचा त्रिकोण हा तर सगळ्या कथाकारांचा अगदी लाडका विषय.. या प्रेमाच्या त्रिकोणात जी व्यक्ती एकतर्फी प्रेम करत असते, तिला काय पद्धतीनी वागवलं जातं अथवा कथेत तिचं स्थान काय हे कितीतरी कथांमधे वेगवेगळ्या प्रकारे दाखवलेलं आहे आजपर्यंत.
आवश्यक नाहीये कि कुणी व्यक्ती एकतर्फीच प्रेम करत असेल कदाचित दोघही एकमेकांवर प्रेम करत असतील तरीही ’बहुजनहिताय बहुजनसुखाय।’ त्यांनी एकत्र न येणं हेच हितकारक असेल. नुकताच जुना रोमन हॊलिडेज पाहीला तरुण ग्रेगरी पेक आणि एन्ड्र्यु हेपबर्न... अतिशय सुंदर चित्रपट तितकाच सुंदर शेवट. या चित्रपटावरुन निघालेले आणि आधी आवडलेले दोन्ही हिंदी चित्रपट मनातुन पार उतरले हा चित्रपट पाहील्यावर. शेवट एकमेकांपासुन अतिशय समंजसपणे आदरपूर्वक दूर होणं मनाला भावून गेलं.
बऱ्याचश्या हिंदी आणि मराठी चित्रपट कथा मात्र कुणाला तरी एकाला त्याग त्याग खेळायला लावून अगदी देवत्व (शब्दशः) प्राप्त करायला लावतात. पण एकंदरीत अजुन काही समाधानकारकपणे हा त्रिकोण हाताळता आलेला दिसत नाहीये.
या बाबतीत मात्र माझी लाडकी लेखिका गौरी देशपांडे हिच्या ’निरगाठी’ कथेला मी तर बुवा पुर्ण मार्क देईन. खरोखरच निरगाठ म्हणाव इतका अवघड प्रश्न तीनी तिच्या सुंदर शैलीत आणि अतिशय व्यवहारी पातळीवर सुरेख हाताळलाय. व्यवहारी अशासाठी की कुणीही विचित्र वागत नाही सगळे अगदी साधे सरळ वागतात या कथेत.
थोडक्यात कथा सांगायची म्हणलं तर एक मुलगी स्वतःच्या सावत्र वडीलांच्या प्रेमात पडलेली. खरं म्हणजे असले गहन प्रश्न गौरीनीच हाताळावेत इतक्या समर्थपणे. कुणीही भ्याडपणा दाखवुन परीस्थितीला पाठ दाखवुन पळुन जात नाही अथवा काय हे असलं अनैतिक वागणं असा आविर्भाव आणुन त्या मुलीला वाळीत वगैरे पण टाकत नाहीत. हा सगळा कथाभाग गौरीनी नेहमीप्रमाणे तिच्या आवडत्या पत्र या लेखन प्रकारातुन अतिशय सुंदर रीत्या उलगडला आहे.
गौरीच्या सर्व लेखनाचा पाया म्हणजे माणसाचं माणसावर असलेलं प्रेम .... यातली माणसं नात्यातलीच असली पाहीजे असं नाही. एकुणच माणुस म्हणुन एका माणसाचं दुसऱ्या माणसावरचं प्रेम. दुसऱ्या व्यक्तीबद्दल घृणा वाटुन न घेता सर्व परीस्थितीत त्याला स्विकारायच आणि तेही आपण काहीतरी फार मोठं करतोय असा उगाच आव न आणता.......
Friday 9 February 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment