Wednesday 21 February 2007

घटना

प्रसंग १ - वेळ सकाळचे नऊ

नेहेमीप्रमाणे आमची बस ऒफिसच्या इमारतीच्या बाहेर थांबली. बसमधुन उतरताच लक्ष वेधुन घेतलं ते दारात झोपलेल्या खरं म्हणजे पडलेल्या छे अगदी खरं म्हणजे कुणी तरी आणुन टाकलेल्या एका म्हाताऱ्यानी. म्हाताऱ्याच्या शरीरावर काहीही वस्त्र नाही पण वरुन कुणी तरी त्याच्या अंगावर एक पिवळी साडी टाकलेली. आणुन टाकलेल्या अशासाठी म्हणलं की म्हाताऱ्याचं हाड न हाड अगदी स्व्च्छ दिसत होतं आणि कसाबसा स्वतःच्या एका हातावर स्वतःच वजन पेलत तो येणाऱ्या जाणाऱ्या कडे अगदी निर्विकारपणे पहात होता. कसलीही अपेक्षा, दुःख किंवा अजुन कसलाही भाव मलातरी त्याच्या चेहऱ्यावर दिसला नाही. त्याच्याकडे पाहुन तो अगदी मरायला टेकलाय हे सांगायला कुठल्याही डॊक्टरची गरज नव्हती. आम्ही बसमधुन उतरुन खाली मान घालुन (असं दुर्लक्षच करायचं असतं ना आपण असल्या (?) गोष्टींकडे?) मनातुन अपराधी वाटुन घेत हापिसात दाखल.

प्रसंग २ - वेळ त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता

आता बसमधुन घरी जायची वेळ. सकाळी पाहीलेल्या म्हाताऱ्याचं काय झालं असेल? तसा दिवसातुन कितीतरी वेळा त्याचा विचार छ्ळून गेला होता. म्हातारा निपचित पडलेला तीच पिवळी साडी पांघरुन. पायाशी कुणीतरी दिवसात कधीतरी दिलेला वडापाव तसाच लोळत पडलेला. आणि मेला का काय म्हातारा या नजरेनं त्याच्याकडे पहाणारे आसपास काही बघे.... आणि काही अरे कुणी तरी म. न. पा. ला कळवा या आवेशात ... आम्ही परत आपला काय संबंध पद्धतीनी बसमधुन घरी

प्रसंग - वेळ दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता

पुन्हा एकदा आम्ही नेहमीप्रमाणे बसमधुन उतरतो. (गुणी हो तसे आम्ही रोज येतो कामावर वेळेत.) चुकार नजर नको नको म्हणलं तरी त्या म्हाताऱ्याचा शोध घेतेय.. आता तिथे तो नाहीये... तिथे फक्त एक बेवारस पिवळी साडी...

2 comments:

Shraddha said...

मीनू, किती सुन्न करणारा अनुभव मांडलायस. खरंच आपण असं का वागत असू? नियमित चाललेल्या आयुष्यात कुठल्याही प्रकारचा disturbance येऊ नये म्हणून?

श्यामली said...

हं :(
वाटत अपराधी, पण काय करु शकतो आपण?
उत्तर नाहीच असत मग जातो पुढे
त्याशीवाय काय असत हातात?