Wednesday 4 April 2007

कथा... तीची..

(खुप दिवसांपासुन एक दिर्घकथा या स्वरुपात काही तरी लिहावं असं मनात घोळतय. लिहायचं धाडस होत नव्हतं याचं कारण म्हणजे जे काही दिसतय ते तुकडे तुकडे स्वरुपात आणि अंतिम साध्य अथवा शेवट असं निश्चित काही मनात येत नाहीये. तरीही आजपासुन लिहायला घेतीये. पूर्ण होईल की नाही माहीत नाही. कोणत्या स्वरुपात लिखाण येईल त्याचाही अंदाज नाही. लिखाण पूर्णता काल्पनिक... छे असं कसं म्हणता येईल..? हे अगदी खरंखुरं लिखाण आहे थोडं स्वतः अनुभवलेलं आसपास बघितलेलं माझ्या असेल अथवा नसेल पण तीच्या आयुष्यात अगदी प्रत्यक्षात घडलेलं. अरे नमनाला बरच झालं की तेल.)

निशा

आयला!! आज जरा उशीरच झाला कॉलेजला जायला. नायतर काय ?? या स्कर्टला परफेक्ट मॅच होतात म्हणुन आणलेले ते ब्राऊन टॉप आयत्या वेळी सापडेनात. खुप शोधल्यावर त्या दिवशी घातलेल्या जीन्स च्या खिशात सापडले. आणि वर परत निघता निघता फादरनी आमटी करायला सांगीतलं. बाहेर आपण कायपण मस्ती करु शकतो पण फादरला उलट उत्तर मात्र देऊन चालत नाही.
"नि अगं ए नि एवढी झपाझप कुठे चाल्लिस म्हणे. आणि काय गं १० वाजुन गेले की ? पहीलं लेक्चर बुडवलस ना? नाहीतरी आपण कुठे बसतो त्या गोट्याच्या लेक्चरला?"
"रु तू आणि जो कुठे फिरताय? हो ना उशीर झालाच आहे मला.. आणि सु, अन्या, गोळ्या, सुन्या तिकडे वाट पहात असतील."
बापरे तुम्हाला कळलिच नसेल नाय का ही भानगड? आमच्यात ना पूर्ण नावानी हाक मारायची पद्धतच नाहीये. म्हणजे रुतुजाला रु, जितु ला जो, सुनिता ला सु ही असलीच पद्धत आहे.
"अग नि हो ना मी आणि जो मॉर्निंग शोला जाणार आहोत माधुरीचा दिल लागलाय. आणि माधुरीचा सिनेमा म्हणजे बस मी त्यासाठी कुठलही लेक्चर बुडविन माहीतीये ना तुला? बरं पण माझं एक काम करशील का? अगं आपल्या वर्गात त्या उमारिमा आहेत ना?"
"उमारीमा ? हा हा ती एक चश्मिस आणि तिच्या बरोबर एक गप्प गप्प असणारी किडकिडीत असली ती स्कॉलर असते त्या दोघी ना?"
"हो ना गं ती किडकिडीत आहे ना ? ती रीमा आणि चश्मेवाली उमा. त्या अगं माझी वाट पहात असतील मी त्यांना दहाला येते बोल्ले होते. कॉलेजमधे जातेस तर तेवढा निरोप दे की मी येत नाहीये म्हणुन...."
"बर देते की.. चल जरा ट्रीपल जाऊ या का मला तिकडे कॉलेजच्या चौकात टाका ना.."
बरं झालं हे दोघं भेटले बरीच पायपीट वाचली. ही रु ना जो भेटला की कुणाला पण डिच करते. पार येडी झालीये या जोच्या मागे. जो म्हणजे सु चा भाऊच. पण एक नंबरचा उनाड आणि थापाड्या. आलच कॉलेज.
"हाय सु एक मिनीट मी विसरायच्या आधी त्या उमारिमांना निरोप देऊन येते मग बोलु या."
मुख्य दरवाजातुन डावीकडे जो वर जायचा जीना आहे तो अर्धा चढुन आले आणि उजव्या हाताच्या मोठ्या खिडकीत रिमा बसलेली दिसली उमा समोरच उभी होती.
"हाय उमा आणि रीमा का? तुम्ही रु ची वाट पहाताय का?"
"हो ना" उमानी हसुन उत्तर दिलं रीमा मात्र निर्विकारपणे काहीशी वैतागुन पहात राहीली माझ्याकडे. हीच माझी आणि तीची पहीली भेट. त्या क्षणी मात्र मला अजिबात कल्पना नव्ह्ती की मी एका वादळाला भेटतेय याची.
"रु येणार नाहीये ती जो बरोबर सिनेमाला गेलीये."
"च्यायला मग आम्हाला कशाला इथे बोलावुन ठेवलय?" रीमाचा अत्यंत तुसडा, बेफिकीर आणि चिडका प्रश्न.
"ओह तुम्हाला अजुन अनुभव नाहीये तर तीचा. जो तिचा पंटर आहे आणि ती सॉलिड प्रेमात आहे त्याच्या तो भेटल्यावर ती कशाला इथे येतीये." मी आणि उमा हसलो. रुमाच्या चेहऱ्यावरचा वैताग मात्र कायम. खिडकीच्या कट्ट्यावरुन खाली उडी मारुन ती सरळ पायऱ्या उतरायला लागली. मी भुवया उंचावुन उमाकडे पाहीलं ती सौम्य हसली. मग मी नि उमाही पायऱ्या उतरायला लागलो.
"तुम्ही दोघीपण बी डीवीजनला का?"
"हो ना तु ए ला आहेस का?"
"हो. तुमची कोणती शाळा"
"माझी हुजुरपागा, रीमाची अहिल्यादेवी"
"अरे मी पण अहिल्यादेवीचीच पण हीला कधी पाहील्याचं आठवत नाही"
बोलताबोलता मेन गेटपाशी आलो. निरोप घेण्यासाठी आम्ही सगळे बसले होते तिथेच थांबलो. मग मी सु आणि गॅंगची या दोघींशी ओळख करुन दिली.
"चला श्रीला जाऊन चहा पिऊ या सगळेजण"
"नको मी घरी चाल्लिये" अर्थात रीमा
"मग चहा पिऊन जा की"
"नको"
"का?" आता मात्र माझ्या प्रश्नावर सटकन उत्तर आलं
"मी चहा पित नाही. आणि मला जाम कंटाळा आलाय त्या रुची वाट बघत बसायला लागल्यामुळे"
"चल ना मग चहा पिऊ मस्त मूड बनेल मग जाशील नाहीतरी तु काय करणार आहेस घरी जाऊन?"
"ए तुला काय प्रॉब्लेम आहे. मी एकदा सांगीतलं ना मी चहा पित नाही आणि मी येणार नाही. दुसरं म्हणजे माझ्याकडे पैसे नाहीयेत चहा प्यायला"
आवाजाची पट्टी वाढतीये पाहून सु एकदम मधे पडली.
"अगं रीमा चल ना आपली आजच मैत्री झाली ना? म्हणुन बसायला तरी चल आमच्याबरोबर. पैशाचं काय तु पुढच्या वेळी दे आत्ता आहेत आमच्याकडे"
"माझ्याकडे कधीच पैसे नसतात तरीही तुमचा आग्रहच असेल तर मी तुमचा चहा पिऊन होईपर्यंत बसेन"
मग वाद, चर्चा अजुन न वाढवता आम्ही सगळेच श्री कडे चालायला लागलो...

1 comments:

Karkashsha said...

Pudhe........?