Monday 11 June 2007

सहल

विकेंडला मुरुड हर्णेला ऑफिसची सहल गेली होती. बापरे! प्रचंड उकाडा .. पुण्यात असताना जरा उकडलं तर किती कटकट करतो आपण? तिथे गेल्यावर मात्र आश्चर्य वाटलं, हे लोक या एवढ्या उकाड्यात कसे दिवस काढत असतील? त्यात पुन्हा वीज असेलच असे नाही, म्हणजे पंखा लावायचीही सोय नाही. भयंकर वाटते कल्पनाही. असो.

यावेळी खुप वेळ निवांत बसायला मिळाला. तसं पाहीलं तर अजिबात कसलाही विचार न करता बसायला... असे क्षण फार मोलाचे वाटतात नाही ? ज्या क्षणांकडून आपली कसलीही अपेक्षा नाहीये. सगळीकडे दमट हवा .. ढगाळ वातावरण.. खरं तर कुठल्याही क्षणी पाऊस पडेल असं वाटतय पण पडत नाहीये. या सगळ्या वातावरणात मधुनच येणारी एखादी मस्त वाऱ्याची झुळुक...

सहज विचार आला या पानांना या झाडांना राग येत असेल का अशावेळी या वाऱ्याचा? ते म्हणत असतील का त्याला ? "आता कशाला आलास? इतका वेळ कुठे होतास जेव्हा उन्हानी आमचा जीव जात होता तेव्हा?" वाऱ्यालाच कशाला? खुप वाट पहायला लावुन, मग येणाऱ्या पावसाचं स्वागत न करता रागावून बसत असतील का? फुलं, पानं, माती... उन्हाची इतकी झळ सोसायला लागली म्हणून.. छे! असं कसं होईल? खरंय! अगदी लगेच उत्तर मिळालचं होतं की मला. पाऊस आल्यावर अथवा वाऱ्याची झुळुक आल्यावर नाचणाऱ्या पानांतुन.. सुगंधित होणाऱ्या, सैरावैरा धावणाऱ्या मातीतुन.. किती वेगळचं नातं आहे त्यांचं.. जेव्हा कधी भेटतात तेव्हा कडकडून अतीव प्रेमानं एकमेकांना आलिंगन देतात. आलेला क्षण साजरा करतात. असा प्रत्येक क्षणच मग सोन्याचा होतो.

एखाद्या विकेंडला, अशी झाडापानाफुलांची मनसोक्त साथ मिळाली तर याहून काय हवं? आणि समुद्रही असेल सोबतीला, तर सोन्याहून पिवळं नाही का? रात्रीच्या वेळी त्याची धीरगंभीर गाज.. सोबतीला रातकिड्यांची किरकिर .. चहूकडे अंधार... अहा! काय सुंदर अनुभव होता. खरंच! या समुद्रापुढे उभं राहीलं कि जाणवतं आपलं खुजेपण. केवढेस्से आपण! काहीच नाही याच्यापुढे. या समुद्राची बरोबरी कुणी करावी, तर फक्त आकाशानेच. दोघही आपापल्या जागी थोर आहेत. निसर्गापुढे आपण काहीच नाही याची तीव्र जाणीव मनात घेऊनच मग परतीचा प्रवास झाला.

2 comments:

तेजस said...

i like it

Anonymous said...

I also like it

OZas