Wednesday 28 February 2007

TP..

Beauty lies in the eyes of beholder!!!
sometimes it may be in the form of disorder ;)

Wednesday 21 February 2007

घटना

प्रसंग १ - वेळ सकाळचे नऊ

नेहेमीप्रमाणे आमची बस ऒफिसच्या इमारतीच्या बाहेर थांबली. बसमधुन उतरताच लक्ष वेधुन घेतलं ते दारात झोपलेल्या खरं म्हणजे पडलेल्या छे अगदी खरं म्हणजे कुणी तरी आणुन टाकलेल्या एका म्हाताऱ्यानी. म्हाताऱ्याच्या शरीरावर काहीही वस्त्र नाही पण वरुन कुणी तरी त्याच्या अंगावर एक पिवळी साडी टाकलेली. आणुन टाकलेल्या अशासाठी म्हणलं की म्हाताऱ्याचं हाड न हाड अगदी स्व्च्छ दिसत होतं आणि कसाबसा स्वतःच्या एका हातावर स्वतःच वजन पेलत तो येणाऱ्या जाणाऱ्या कडे अगदी निर्विकारपणे पहात होता. कसलीही अपेक्षा, दुःख किंवा अजुन कसलाही भाव मलातरी त्याच्या चेहऱ्यावर दिसला नाही. त्याच्याकडे पाहुन तो अगदी मरायला टेकलाय हे सांगायला कुठल्याही डॊक्टरची गरज नव्हती. आम्ही बसमधुन उतरुन खाली मान घालुन (असं दुर्लक्षच करायचं असतं ना आपण असल्या (?) गोष्टींकडे?) मनातुन अपराधी वाटुन घेत हापिसात दाखल.

प्रसंग २ - वेळ त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता

आता बसमधुन घरी जायची वेळ. सकाळी पाहीलेल्या म्हाताऱ्याचं काय झालं असेल? तसा दिवसातुन कितीतरी वेळा त्याचा विचार छ्ळून गेला होता. म्हातारा निपचित पडलेला तीच पिवळी साडी पांघरुन. पायाशी कुणीतरी दिवसात कधीतरी दिलेला वडापाव तसाच लोळत पडलेला. आणि मेला का काय म्हातारा या नजरेनं त्याच्याकडे पहाणारे आसपास काही बघे.... आणि काही अरे कुणी तरी म. न. पा. ला कळवा या आवेशात ... आम्ही परत आपला काय संबंध पद्धतीनी बसमधुन घरी

प्रसंग - वेळ दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता

पुन्हा एकदा आम्ही नेहमीप्रमाणे बसमधुन उतरतो. (गुणी हो तसे आम्ही रोज येतो कामावर वेळेत.) चुकार नजर नको नको म्हणलं तरी त्या म्हाताऱ्याचा शोध घेतेय.. आता तिथे तो नाहीये... तिथे फक्त एक बेवारस पिवळी साडी...

Sunday 11 February 2007

समर्थन कशासाठी..?

कुठल्याही कृतीचं स्पष्टीकरण द्यायला लागलं अथवा समर्थन करायला लागलं तर खरं म्हणजे संताप संताप होतो माझा. कधी कधी ते न देण्यासाठी कुठलीही टोकाची भुमिका घ्यावी असही वाटतं. एखादी गोष्ट का केली? याचं उत्तर "असं करावसं वाटलं म्हणुन" हे का असु नये? नव्हे हेच उत्तर खरं असतं माझ्यामते. मग हे उत्तर लोकांना पटणार नाही म्हणुन त्यांना पटेल असं एखादं उत्तर मी शोधायचं. माझं उत्तर इतरांना पटलच पाहीजे असा अट्टाहास तरी कशासाठी...?

अनेकानेक वर्ष एकत्र राहूनही अशा प्रश्नांची उत्तर द्यायला लागत असतील तर ती हारच वाटते मला तरी. जी व्यक्ती हा प्रश्न विचारेल ती अर्थातच आपल्याला ओळखत नाही. मग कशाला उत्तरं तरी देत बसावं?

खुपदा प्रश्न पडतो आपण आयुष्य जगतोय की चालवतोय? एखादी संघटना / कार्यालय चालवल्यासारखं जिथे सर्व संचालक काय करावं काय नाही यावर एकत्रित विचार करुन निर्णय घेतात.

Friday 9 February 2007

प्रेम प्रेम प्रेम..

इश्क ने निकम्मा कर दिया गालिब
वरना हम भी आदमी थे काम के...

इश्क नचाये जिसको यार..
वो फिर नाचे बीच बजार..

प्रेमाच इतक्या सार्थ शब्दात वर्णन करणाऱ्या त्या कविंना सलाम!
प्रेमाचा त्रिकोण हा तर सगळ्या कथाकारांचा अगदी लाडका विषय.. या प्रेमाच्या त्रिकोणात जी व्यक्ती एकतर्फी प्रेम करत असते, तिला काय पद्धतीनी वागवलं जातं अथवा कथेत तिचं स्थान काय हे कितीतरी कथांमधे वेगवेगळ्या प्रकारे दाखवलेलं आहे आजपर्यंत.

आवश्यक नाहीये कि कुणी व्यक्ती एकतर्फीच प्रेम करत असेल कदाचित दोघही एकमेकांवर प्रेम करत असतील तरीही ’बहुजनहिताय बहुजनसुखाय।’ त्यांनी एकत्र न येणं हेच हितकारक असेल. नुकताच जुना रोमन हॊलिडेज पाहीला तरुण ग्रेगरी पेक आणि एन्ड्र्यु हेपबर्न... अतिशय सुंदर चित्रपट तितकाच सुंदर शेवट. या चित्रपटावरुन निघालेले आणि आधी आवडलेले दोन्ही हिंदी चित्रपट मनातुन पार उतरले हा चित्रपट पाहील्यावर. शेवट एकमेकांपासुन अतिशय समंजसपणे आदरपूर्वक दूर होणं मनाला भावून गेलं.

बऱ्याचश्या हिंदी आणि मराठी चित्रपट कथा मात्र कुणाला तरी एकाला त्याग त्याग खेळायला लावून अगदी देवत्व (शब्दशः) प्राप्त करायला लावतात. पण एकंदरीत अजुन काही समाधानकारकपणे हा त्रिकोण हाताळता आलेला दिसत नाहीये.

या बाबतीत मात्र माझी लाडकी लेखिका गौरी देशपांडे हिच्या ’निरगाठी’ कथेला मी तर बुवा पुर्ण मार्क देईन. खरोखरच निरगाठ म्हणाव इतका अवघड प्रश्न तीनी तिच्या सुंदर शैलीत आणि अतिशय व्यवहारी पातळीवर सुरेख हाताळलाय. व्यवहारी अशासाठी की कुणीही विचित्र वागत नाही सगळे अगदी साधे सरळ वागतात या कथेत.

थोडक्यात कथा सांगायची म्हणलं तर एक मुलगी स्वतःच्या सावत्र वडीलांच्या प्रेमात पडलेली. खरं म्हणजे असले गहन प्रश्न गौरीनीच हाताळावेत इतक्या समर्थपणे. कुणीही भ्याडपणा दाखवुन परीस्थितीला पाठ दाखवुन पळुन जात नाही अथवा काय हे असलं अनैतिक वागणं असा आविर्भाव आणुन त्या मुलीला वाळीत वगैरे पण टाकत नाहीत. हा सगळा कथाभाग गौरीनी नेहमीप्रमाणे तिच्या आवडत्या पत्र या लेखन प्रकारातुन अतिशय सुंदर रीत्या उलगडला आहे.

गौरीच्या सर्व लेखनाचा पाया म्हणजे माणसाचं माणसावर असलेलं प्रेम .... यातली माणसं नात्यातलीच असली पाहीजे असं नाही. एकुणच माणुस म्हणुन एका माणसाचं दुसऱ्या माणसावरचं प्रेम. दुसऱ्या व्यक्तीबद्दल घृणा वाटुन न घेता सर्व परीस्थितीत त्याला स्विकारायच आणि तेही आपण काहीतरी फार मोठं करतोय असा उगाच आव न आणता.......

Thursday 8 February 2007

पत्र

रोज किती तरी ईमेल लिहीत असतो आपण सगळे आणि वाचतही असतो. पण पत्र म्हणलं की कसं वेगळच वाटतं. पत्रात जी मजा आहे ती ईमेलमधे नाही. ते पत्रासाठी त्या पोस्टमनची वाट पाहणं .. ते त्याचं अंती एकदाचं येणं आणि पत्र देऊन जाणं ... कसली रम्य कल्पना आहे ही. :P काय काय असतं त्यात पाहण्यासारखं अगदी पाकिटाच्या रंगापासुनच सुरुवात होते त्यातुन गुलाबी असेल पाकिट तर काय मग विचारायलाच नको. :P

छे ! पण सगळ्यांच्या नशीबी कुठुन येणार गुलाबी पाकिटं? माझ्याइतकं खडतर नशीब पत्रांच्या बाबतीत माझच.... मला आत्तापर्यंतच्या संपूर्ण :) आयुष्यात पत्र म्हणावं असं फक्त एका मैत्रिणीचं पत्र आलं ९७ साली तेवढचं. बाकी मग माझ्या नावानी बरीच पाकिटं येतात ती सगळी परीक्षेची admit card, result, कसली कसली बिलं या सदरातच मोडतात. हो! नाही म्हणायला, काही दिवसांपुर्वी पत्रद्वारा दासबोध अभ्यास करायचा घाट घातला होता तेव्हा त्या पेपरांचं परीक्षण करुन पत्रानी यायचं, तर असो. मुद्दा तो नाहीये.

पत्र आल्यावर किती तरी गोष्टी असतात नाही निरीक्षण करण्यासारख्या? उदाहरणार्थ पाकिटाचा रंग, पोष्टाच्या स्टांपवरचं चित्र (पूर्वी कुणाकुणाकडून मागुन आणून विदेशी ष्टांप जमवले होते मी :)) , मग तो पोष्टाचा सुप्रसिद्ध शिक्का. या सगळ्याची पत्र पाठवणाऱ्यानी केलेली निवडही काही न काही सांगत असते आपल्याला.

मग पुढे म्हणजे हस्ताक्षर... हस्ताक्षर लागत नसल्याने येणारी मजा अथवा होणारी स्वाभाविक चिडचिड..(खोडलेले शब्द वाचण्यातली जी मजा आहे ती या आजच्या स्वच्छ ईमेलमधे कुठुन येणार? :P) सर्व प्रथम लक्ष वेधुन घेणार तो पत्रावर लिहीलेला ’श्री’ किंवा ’श्रीराम’ किंवा तत्सम काही शुभ शब्द. मग तारीख स्थळ वगैरे. हे सर्व त्या उपलब्ध जागेत कौशल्यानी आणि नीटनेटकं लिहीता येणं हि एक कलाच की.. मग मायना काय लिहीलाय ते पण खुप काही सांगुन जायचा. हो ना किती तरी लोकांना (पूर्वी हो..) .. हा प्रश्न पडायचा म्हणजे प्रिये लिहु की, माझी प्रिय वगैरे.. वगैरे.. नाहीतर आपण ऊठसुट हाय बाय लिहून मोकळे पलिकडे कुणी का असेना :) .

पत्राचा मुख्य मजकुर त्यातही काही अधोरेखित रंगीबेरंगी असं करुन महत्वाच्या विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी कुणी कुणी किती तरी वेळ खर्च केलेला असतो. कुणाला काही द्यायचं असेल तर तुमचा वेळ द्या असं उगीच नाही म्हणत. तर कुणीतरी आपल्यासाठी खास वेळ काढलाय ही भावनाच मस्त आहे. शेवटी ’ता. क.’ आजही आपण बोलतानाही ’ता. क.’ वापरुन एखाद्या विशिष्ठ विषयाचं महत्व पटवुन देत असतो त्यावरुनच त्याचं महत्व कळतं.

शेवट तर फारच महत्वाचा बाब्बा .. :) तुझी/ झा, सर्वस्वी तुझी / झा यापुढे कधी कधी अत्यंत महत्वाचं असं एक अक्षर ’च’ ही लावलेलं असणार वगैरे वगैरे.. या सर्वांपेक्षा महत्वाचं म्हणजे आपल्याला पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीचा ह्या पत्राला स्पर्श झालाय ही भावना.. मान्य आहे हे जरा अतिच emotional होतय पण काय खोट आहे त्यात?

या सगळ्यामुळे तयार झालेली ती एकापेक्षा एक सुंदर गाणी ती कशी विसरले मी ?
हमने सनमको खत लिखा खत मे लिखा..
ये मेरा प्रेमपत्र पढकर..
डाकिया डाक लाया डाक लाया..
लिखे जो खत तुझे जो तेरी याद में..

तेरी खुशबु मे बसे खत मै जलाता कैसे...
प्यार में डुबें हुवे खत मै जलाता कैसे..
तेरे खत आज मै गंगा में बहा आया हूं
आग बेहते हुऎ पानी में लगा आया हूं

Tuesday 6 February 2007

तुम को देखा तो ये

तुम को देखा तो ये खयाल आया ।
जिंदगी धूप तुम घना साया ।

आज फिर दिलने इक तमन्ना की..
आज फिर दिलको हमने समझाया ।
जिंदगी धूप तुम घना साया ।

तुम चले जाओगे तो सोचेंगे..
हमने क्या खोया हमने क्या पाया ?
जिंदगी धूप तुम घना साया ।

हम जीसे गुनगुना नही सकते..
वक्त ने ऐसा गीत क्यों गाया ?

जिंदगी धूप तुम घना साया ।

Friday 2 February 2007

बदल

ज्याची वाट बघत होते तो weekend आला एकदाचा आणि इथे लिहायला वेळ मिळाला. आख्खा आठवडा अत्यंत कंटाळवाणा गेला. हल्ली मला वाटतं, सगळेच दिवस, आठवडे, महीने एकंदरीत पहायला गेलं तर कंटाळवाणेच चालले आहेत. याचं खरं कारण म्हणजे लहरीपणा. लहानपणापासुन खरं म्हणजे माझा स्वभाव लहरीच. शेजारच्या मामींनी तर मला ’लहरी खटलं’ असं नावही बहाल करुन टाकलं होतं. या लहरीपणाचं खरं स्वरुप म्हणजे, तोचतोचपणाचा कंटाळा असं आहे. एकसारखं, एकसुरी असं काही सुरु झालं, की मला लग्गेच कंटाळा येतो. काहीतरी बदल हवा, हा विचार सतत छळायला लागतो. म्हणजे थोडक्यात असं, की एखादी गोष्ट मार्गी लागली आणि छानशी घडी बसली की आलाच मला कंटाळा..
सारखा काही तरी प्रश्न हवा सोडवायला.. सारखं कसलंतरी संकट हवं.. सवयीचा भाग बाकी काही नाही. कितीतरी वेळा मी ठरवते, सगळ कसं नीट चाल्लय काही गडबड करायची नाही. पण मग मला एकदमच अळणी वाटायला लागतं आयुष्य, मग काही न काही नवीन उकरुन काढायचं ... कसली तरी परीक्षा ओढवुन घे... कसलं तरी नविनच जबाबदारीचं काम ओढवुन घे किंवा काहीही .. पण बदल हवा अगदी आवश्यक...
तर सध्याही असच झालय, हापिसात फारसा ताण नाहीये पण त्यामुळे जे करायचं, करायला हवं तेही काम मी करत नाही.. डोक्यावर काहीतरी तणाव असल्याशिवाय, deadline असल्याशिवाय काम करता येऊ नये ही खरं तर दुःखद बाब आहे. उलट ताणतणाव नसल्यावर आणि कसलीही घाईगडबड नसल्यावर, खरं तर जास्त चांगलं काम करता यायला हवं, तर मला कंटाळा येतो.
सारा वेळ मला काही तरी adventurus, thrilling असं काहीतरी करावसं वाटत असतं. छे ! या असल्या विचारांना खतपाणी घालता कामा नये. आयुष्यातला ८०% काळ हा असाच असेल खर पाहीलं तर..
असो. तर एकंदरीत सध्या नेहेमीप्रमाणेच कंटाळवाणे आहेत दिवस..