Sunday 17 February 2008

आजच्या ताज्या कुर्कुरीत आणि फ्रेश बातम्या

आज सकाळी फ. ण. से. च्या कार्यकर्त्यांनी बदलत्या हवामानाचा निषेध म्हणून तीन बशींच्या काचा फोडल्या. आमच्या बातमीदाराने अधिक माहीती काढल्यावर असे कळते की, अचानक थंडी किंवा अचानक उकाडा असे अस्थिर तापमान हे राज्यातील अस्थिर नेतृत्वामुळेच आहे असा फ. ण. से. चे युवा नेते मा. ज. भाकरे यांचा दावा आहे.

आज सकाळी अचानकच अति उकाडा वाटू लागल्याने लोक पुन्हा चिंतेत पडलेले आढळले. तशातच आकाशात अचानकच खूप सारी हेलिकाप्टरे, ग्लायडरे, पॅराशूटे उडताना पाहून लोक अधिकच भांबावले. सर्व उड्डाणवाहनांवर फणसाचे चित्र मोठ्या दिमाखात मिरवत होते.

आमच्या बातमीदाराने फ. ण. सें चे धडाडीचे युवा नेते मा. ज. भाकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संताप अनावर झाला.

"अरे हे आकाश म्हणजे काय धर्मशाळा वाटली की काय? उत्तरेकडचे ढग सरळ कुणाचीही परवानगी न घेता महाराष्ट्राच्या आकाशात दाखल होतात आणि आम्ही फक्त पहात राहू असं वाटलं की काय? आमचे धडाडीचे कार्यकर्ते मिळेल ते वाहन घेऊन उडाले आणि उत्तरेकडून येणारे सर्व ढग त्यांनी पळवून लावले."

"पण यामुळे आपल्याला जास्त ऊन सहन करायला लागतय नाही का ...? "

"अरे ऊन सहन करायला लागलं तर करु ते आमचं ऊन आहे. पण दुसर्‍या प्रांतातल्या ढगांनी सावली धरलेली आम्ही कदापिही खपवून घेणार नाही."

"अजून पुढे कुठली आंदोलनं करण्याचा आपला विचार आहे?"

"आम्ही दुसर्‍या प्रांतातुन आपल्या प्रांतात घुसणारी प्रत्येक गोष्ट रोखणार आहोत माणसे, हवा, वारा, पणी, ढग सारं काही रोखुन धरणार."

त्यांचा आवेश पाहून आमच्या वार्ताहराने स्वतःचा श्वास बराच वेळ रोखुन धरल्याचे कळते.

इतक्यात आतुन एक भरभक्कम बायकी आवाज दणाणला. "अहो ...! हा काय मूर्खपणा चाल्लाय ..? "

"अगं हळू हळू केवढ्यांदा ओरडतेस बाहेर वार्ताहर आलेत." आवाजात किंचित उतार आणण्याचा असफल प्रयत्न.

"अहो ..! आपल्या पिंट्याला क्लासला जायचंय आणि बाहेर काय हे ऊन ..? अहो केव्हा कसली आंदोलन करावी एवढंही कळू नये तुम्हाला ..? ढग ऍडवतायत म्हणे ढॅग ... बर्‍या बोलानं सावली आणा नाहीतर आजपासून तुमचं घरातलं जेवण बंद करीन"

नंतर हळू आवाजात फोनवर बोलणे झाले आणि अचानक सर्व हवाई वाहनांचा आवाज बंद झाला रस्तेही सावलीने झाकले गेल्याचे वृत्त आहे.
**********************************************
वरील लेख, लेखातील सर्व पात्रे व घटना काल्पनिक असून ते सत्याशी मिळतेजुळते भासल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

जरी आमच्या वृत्तपत्रात वरील बातमी प्रसिद्ध झाली तरी संपादक लेखकाच्या मताशी सहमत असतीलच असे नाही याची वाचकाMनी नोMद घ्यावी ही नम्र विनंती.

1 comments:

Abhi said...

बरं झालं इकडे टाकलंस ते.. मला गडावर वाचायलाच मिळालं नव्हतं.. हसून हसून पुरेवाट अगदी!!